
नवी दिल्ली (pragatbharat.com) : व्हिएतनामचे राष्ट्रपती टो लॅम यांचे आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक आणि शाही स्वागत करण्यात आले. भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेल्या टो लॅम यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगी स्वागत केले. यावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आले.
द्विपक्षीय चर्चेवर भर: या स्वागत सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती टो लॅम यांच्यात उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा पार पडणार आहे. या बैठकीत व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. याशिवाय, प्रादेशिक आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवरही दोन्ही देशांचे प्रमुख आपले विचार मांडणार आहेत.
दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती: राष्ट्रपती भवनातील या सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः दक्षिण-पूर्व आशियातील शांतता आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांचे संबंध निर्णायक ठरणार आहेत.

