शिक्षकांसमोर पेच! जनगणना की नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण? मे-जूनमधील दुहेरी ड्युटीमुळे राज्यभरातील शिक्षक संभ्रमात

छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : राज्यातील प्राथमिक शिक्षकांसमोर सध्या कामाच्या नियोजनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण आज, ८ मे पासून सुरू होत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय जनगणनेचा पहिला टप्पाही याच काळात राबवला जात आहे. या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी आल्याने ‘प्रशिक्षण घ्यावे की जनगणनेचे काम करावे?’ अशा संभ्रमात शिक्षक अडकले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी ते चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. या नवीन अभ्यासक्रमाची माहिती शिक्षकांना देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) मे आणि जून महिन्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. आजपासून कोपरगाव येथे राज्यस्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून, त्यानंतर १२ मे पासून जिल्हास्तरावर आणि २५ मे पासून तालुकास्तरावर हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ६ हजारहून अधिक शिक्षक या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.

दुसरीकडे, जनगणनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणनेचा पहिला टप्पाही मे-जूनमध्येच पूर्ण करायचा असल्याने शिक्षकांना सुट्टीच्या काळात दुहेरी ताण सहन करावा लागत आहे. १५ जून रोजी शाळा सुरू होण्यापूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करणे शिक्षण विभागासाठी अनिवार्य आहे, मात्र जनगणनेच्या कामामुळे प्रशिक्षणाला उपस्थित राहणे अनेकांना कठीण जात आहे.

प्रशिक्षणाचे नियोजित वेळापत्रक:

  • राज्यस्तरीय प्रशिक्षण: ८ मे पासून सुरू.
  • जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षण: १२ मे ते २१ मे.
  • तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण: २५ मे ते १२ जून.

प्रशासनाने या दोन्ही कामांचा ताळमेळ बसवून शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *