
सातारा (pragatbharat.com) : सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंबीर नेतृत्व आणि कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे ‘तुतारी’ची साथ सोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
देवराज पाटील हे पालीच्या प्रसिद्ध खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पाल मतदार संघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आणि विकासकामांसाठी सत्ताधारी गटाची साथ आवश्यक असल्याचे ओळखून पाटील यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कराड तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.
विशेष म्हणजे, देवराज पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. एका स्नेहभोजनाच्या निमित्ताने झालेल्या या चर्चेत पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. स्वतः खासदार नितीन पाटील यांनीही विकासकामांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे कबूल केले आहे.
देवराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे माजी काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांचे मामा आहेत. कराड उत्तरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजप आणि महायुतीची ताकद वाढत असताना, देवराज पाटील यांच्यासारखा मोठा चेहरा सोडून गेल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

