सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी; पराभवानंतरही पक्ष निष्ठा राखल्याने फडणवीसांकडून पुनर्वसन

सोलापूर (pragatbharat.com) : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असून, सोलापूर मतदारसंघातून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावावर वरिष्ठ नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे. राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) नेते दिलीप सोपल यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतरही राऊत यांनी पक्षकार्य जोमाने सुरू ठेवले होते, ज्याची मोठी पावती त्यांना या उमेदवारीच्या रूपाने मिळाली आहे.

राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजेच ६ जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समिती जागांवर भाजपचा विजय खेचून आणला होता. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा बाजूला सारून पक्षाने राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेंद्र राऊत हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ६१६ असून, पक्षीय बलाबल पाहता भाजपचे पारडे अत्यंत जड आहे. एकट्या भाजपकडे ३०७ मते असून, मित्रपक्ष शिवसेना (७६) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (५१) यांच्या बळामुळे महायुतीचे संख्याबळ ४३४ च्या वर जाते. त्या तुलनेत महाविकास आघाडीकडे (काँग्रेस, शिवसेना UBT, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) अवघी ७८ मते आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी भाजप ११ जागा, एकनाथ शिंदेंची शिवसेना ४ जागा, तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *