‘मोहिनी’ मालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा; शालिनीच्या लग्नात प्रतापरावाची एन्ट्री, समोर येणार धक्कादायक सत्य?

मुंबई (pragatbharat.com) : कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या अत्यंत रंजक आणि उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नाची जोरदार लगबग सुरू असून, घरात लग्नकार्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात आता एका मोठ्या विघ्नाची सावली पडणार असून, प्रतापरावाच्या अचानक होणाऱ्या एन्ट्रीमुळे शालिनीच्या भूतकाळातील धक्कादायक सत्य सर्वांसमोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मालिकेत प्रचंड हाय-व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या कथानकानुसार, मोहिनीने घरच्यांना सोबत घेऊन लग्नाचे भव्य प्लॅनिंग केले असून वेडिंग प्लॅनर आणि डेकोरेटर्सची घरात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, आरके (RK) याने बंटीला सोबत घेऊन या लग्नसोहळ्यात मोठे ‘महानाट्य’ घडवण्याची पूर्ण तयारी केली आहे. पारूबाईने घरात आणलेल्या ज्योतिष्याने ‘हे लग्न झाल्यास मोठा अनर्थ होईल’ अशी भविष्यवाणी केली असली, तरी मोहिनी मात्र ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लावून देण्याच्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, कार्तिकीने नकळतपणे प्रतापरावांशी संपर्क साधल्यामुळे शालिनी प्रचंड घाबरली आहे. यापूर्वी मोहिनीने शालिनीचे जुने मंगळसूत्र तोडून तिला त्या जाचातून मुक्त केले होते आणि प्रतापरावला शालिनीच्या पायावर नाक घासायला लावेन, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती.

आता या संपूर्ण लग्नसोहळ्यात अनेक मोठे ट्वीस्ट एकाच वेळी येणार आहेत. एकीकडे आरकेने मोहिनीचा स्वाभिमान दुखावण्यासाठी पडद्यामागून अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत, तर दुसरीकडे महेंद्र शालिनीसाठी स्वतः नवीन मंगळसूत्र घेऊन येणार आहे. शालिनीच्या हातावर मेहंदी रंगत असतानाच तिला तिच्या वेदनादायी भूतकाळाची आठवण छळत आहे. त्यातच मुकुंद देखील या लग्नात मोहिनीला मागणी घालण्याच्या विचारात आहे. प्रतापराव आता मुंबईच्या दिशेने निघाला असल्याने शालिनी आणि महेंद्रचे हे लग्न सुखरूप पार पडणार की मोडणार? आणि मोहिनी आपली प्रतिज्ञा कशी पूर्ण करणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी कमालीचे उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *