अटल सेतूवरून उडी मारलेल्या पतीचा मृत्यू दाखला मिळेना; ‘त्या’ घटनेनंतर दोन वर्षांनी पत्नीची मुंबई हायकोर्टात धाव

मुंबई/डोंबिवली (pragatbharat.com) : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू या पुलावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या डोंबिवलीतील एका तरुणाच्या कुटुंबाला आज पावणे दोन वर्ष उलटूनही भीषण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या तरुणाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसल्याने, त्याचा मृत्यूचा दाखला (Death Certificate) मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीने आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे.

नेमके प्रकरण काय? डोंबिवलीतील पलावा सिटी येथे राहणारा ३८ वर्षीय इंजिनिअर करुतुरी श्रीनिवास याने २४ जुलै २०२४ रोजी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारली होती. श्रीनिवासवर मोठे कर्ज होते आणि तो आर्थिक अडचणीत होता. त्याने पुलावर आपली कार उभी केली आणि समुद्रात झेप घेतली, ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र, पोलिसांनी आणि कोस्टल गार्डने शोधमोहीम राबवूनही त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

प्रशासकीय अडथळा आणि पत्नीची ससेहोलपट: श्रीनिवासची पत्नी सुनैना करुतुरी यांनी मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी नवी मुंबई, उरण आणि पनवेल अशा तीन महानगरपालिकांच्या चकरा मारल्या. मात्र, “आमच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली नाही,” असे सांगत तिन्ही प्रशासनांनी दाखला देण्यास नकार दिला. मृत्यूचा दाखला नसल्यामुळे सुनैना यांना पतीचे बँक खाते, विमा आणि इतर कायदेशीर कामे पूर्ण करता येत नाहीत. त्यातच त्यांच्याकडे दिव्यांग मुलगी आणि वृद्ध आईची जबाबदारी असल्याने त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. अखेर हतबल होऊन त्यांनी आपल्या पतीला ‘मृत घोषित’ करावे आणि मृत्यूचा दाखला देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जुलै महिन्यात अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *