बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश म्हणजे ‘जिवंत समाधी’; सामनातून जहरी टीका, भाजप मित्रपक्षांना गिळणार?

मुंबई (pragatbharat.com) : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच त्यांची विधान परिषदेची उमेदवारीही निश्चित झाली आहे. मात्र, या राजकीय घडामोडींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून बच्चू कडू आणि महायुतीवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

‘कडू महाराजांची जिवंत समाधी’: सामनाच्या अग्रलेखातून बच्चू कडू यांच्यावर प्रहार करताना म्हटले आहे की, कडू यांनी मिंधे गटात विलीन होऊन आपली ‘जिवंत समाधी’ घेतली आहे. समाजसेवेचा बुरखा पांघरून कडू यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला असून, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते सत्तेसाठी तडफडत होते, अशी जहरी टीका करण्यात आली आहे. “दिव्यांग, शेतकरी आणि विधवा जिथे होत्या तिथेच आहेत, मात्र कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीसाठी विधान परिषदेच्या पायरीवर चढले आहेत,” अशा शब्दांत त्यांच्यावर शाब्दिक फटकारे ओढले आहेत.

भाजप मित्रपक्षांना गिळणार? या अग्रलेखात भाजपच्या भविष्यातील रणनीतीवरही मोठे भाष्य करण्यात आले आहे. भाजप भविष्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना बाजूला सारून निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा दावा सामनातून करण्यात आला आहे. “आज बच्चू कडूंचा पक्ष गिळला गेला, उद्या शिंदे आणि अजितदादांचे शिलेदारही भाजपमध्ये जातील,” असे भाकीत या अग्रलेखात वर्तवण्यात आले आहे.

राजकीय समीकरणे बदलणार: बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे अमरावती आणि विदर्भातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, ‘सामना’च्या या टिकेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील कलगीतुरा पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *