
कोलकाता (pragatbharat.com) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाला धक्का दिला असून, राज्यात मोठा राजकीय उलटफेर होताना दिसत आहे. २९३ जागांच्या कलानुसार, भारतीय जनता पक्ष (BJP) तब्बल १९३ जागांवर आघाडी घेत ऐतिहासिक विजयाकडे कूच करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) मोठा फटका बसला असून, ते केवळ ९५ जागांवर आघाडीवर आहेत.
राज्यात सत्तास्थापनेसाठी १४८ जागांच्या बहुमताची गरज असताना भाजपने ही मर्यादा केव्हाच ओलांडली आहे. विशेष म्हणजे, आर.जी. कर रुग्णालयातील घटनेतील पीडित डॉक्टरच्या आई आणि भाजप उमेदवार रत्ना देबनाथ या पाणीहाटी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये सुवेंदु अधिकारी यांनी आपली पकड कायम ठेवली असून, भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर असल्या तरी त्यांच्या पक्षाची पिछाडी चिंतेचा विषय ठरली आहे.
यावेळच्या निवडणुकीत विक्रमी ९२.४९ टक्के मतदान झाले होते, जे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक मतदान ठरले आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून, बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि डाव्या आघाडीची पुन्हा एकदा वाताहत झाली असून सीपीएम केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी सुरू असून, संध्याकाळपर्यंत बंगालच्या या नव्या राजकीय पर्वावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.

