
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील पवई परिसरात शनिवारी रात्री उशिरा एक भीषण हिट अँड रनची घटना घडली आहे. जेव्हीएलआर (JVLR) रोडवर आयआयटी मार्केटजवळ एका भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या ३ पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून, एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर परिसरातून जाणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा कार अत्यंत वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट पादचाऱ्यांमध्ये घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसलेले नागरिक हवेत उडून काही अंतरावर फेकले गेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो पाहून अंगावर काटा येतो.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पवई पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत १९ वर्षीय आरोपी चालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील रस्त्यांवरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चालक नशेत होता का, याचीही पडताळणी केली जात आहे.

