
नाशिक (pragatbharat.com) : नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टन खरात याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपली पकड घट्ट केली आहे. या तपासाचा भाग म्हणून रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची तब्बल ८ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक दावे केले आहेत.
प्रतिभा चाकणकर यांनी ईडीला सांगितले की, त्यांनी स्वतःचे आणि मुलगा तनमय चाकणकर याचे आधार आणि पॅन कार्डचे तपशील खरात याला केवळ धार्मिक कामासाठी दिले होते. मात्र, खरातने या विश्वासाचा गैरवापर करून त्यांच्या नावे बोगस बँक खाती उघडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तपासात समोर आले आहे की, २०२५ ते २०२६ या काळात प्रतिभा आणि खरात यांच्यात २३० कॉल्स आणि २०० हून अधिक मेसेजेस झाले होते.
नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेतील १३४ संशयास्पद खात्यांपैकी ४ खाती चाकणकर यांच्या नावावर असल्याचे आढळले आहे. या खात्यांमध्ये २०२१ मधील २६ लाख रुपयांवर ४० लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचे आर्थिक धागेदोरेही ईडीच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात आता प्रतिभा यांचा मुलगा तनमय चाकणकर यालाही ईडीने समन्स बजावले असून, या घोटाळ्याचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.

