
मुंबई (pragatbharat.com) : गोरेगाव येथील NESCO सेंटरमधील ड्रग ओव्हरडोसमुळे झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा मुख्य आरोपी महेश ‘मार्क’ खेमलाणी याने हे ड्रग्स आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कद्वारे थेट युरोपमधून मागवल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
जर्मनी आणि बेल्जियम कनेक्शन: पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्कने एका जर्मन ड्रग पेडलरकडून सुमारे ४००० अंमली गोळ्यांची ऑर्डर दिली होती. हे ड्रग्स बेल्जियममार्गे भारतात पाठवण्यात आले होते. ही तस्करी दोन टप्प्यांत करण्यात आली असून, पहिल्या खेपेत ३००० आणि दुसऱ्या खेपेत १००० गोळ्या मागवण्यात आल्या होत्या. या गोळ्यांचा पुरवठा कुरिअरच्या माध्यमातून उल्हासनगर येथील त्याचा सहकारी आयुष साहित्य याला करण्यात आला होता.
थायलंडमध्ये झाली होती ओळख: तपासात असे समोर आले आहे की, हा परदेशी पेडलर मार्कचा जुना ओळखीचा आहे. या दोघांची पहिली भेट थायलंडमध्ये झाली होती. विशेष म्हणजे, हा परदेशी पेडलर अनेकदा भारतात येऊन गेला असून त्याने मार्कसोबत मुंबई, गोवा आणि इतर राज्यांमध्ये प्रवासही केला आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचे हे जाळे आता पोलिसांच्या रडारवर आले आहे.
NESCO प्रकरणाचे गांभीर्य: काही दिवसांपूर्वी नेस्को सेंटरमधील एका कार्यक्रमादरम्यान दोन तरुण विद्यार्थ्यांचा अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू झाला होता. या घटनेने मुंबईत मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचे कनेक्शन थेट युरोपशी जुळल्याने मुंबई पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथक अधिक सखोल तपास करत आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती स्थानिक लोकांचा समावेश आहे, याचा शोध आता घेतला जात आहे.

