
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव (पश्चिम) भागात झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात बांगूर नगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका अट्टल घरफोड्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला १०० टक्के ऐवज म्हणजेच तब्बल १० लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तीर्थयात्रेला गेल्यावर झाली चोरी: बांगूर नगरमधील हरिरत्न वर्षा सोसायटीत राहणारे ७३ वर्षीय निवृत्त नागरिक कृष्ण शंकर अय्यर हे ७ ते ९ एप्रिल दरम्यान आपल्या पत्नीसह तीर्थयात्रेला गेले होते. यादरम्यान बंद घराचे कुलूप तोडून चोराने आत प्रवेश केला आणि कपाटातील दागिने लंपास केले. अय्यर दाम्पत्य घरी परतल्यावर ही चोरी उघडकीस आली, त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
अट्टल गुन्हेगार गजाआड: तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून परशुराम विलास शेंडगे (४२) याला ओशिवरा भागातून ताब्यात घेतले. परशुराम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर ओशिवरा, विलेपार्ले आणि गुन्हे शाखेत यापूर्वीही अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
१०.९ लाखांची वसुली: पोलिसांनी आरोपीकडून ६ तोळे सोन्याची चेन, साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, नवरत्न अंगठी आणि हिऱ्याचे डूल असा एकूण १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल आणि ३० हजार रुपये रोख जप्त केले आहेत. ही कारवाई परिमंडळ ११ चे वरिष्ठ अधिकारी आणि बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

