ठाणेकरांनो लक्ष द्या! घोडबंदर रोडवर मोठे ट्रॅफिक बदल; पादचारी पुलाच्या कामासाठी ‘या’ तारखांना रस्ता बंद, पाहा पर्यायी मार्ग

ठाणे (pragatbharat.com) : ठाण्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या घोडबंदर रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ब्रह्मांड जंक्शन आणि मुल्लाबाग बस डेपो जवळ उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाच्या (Foot Overbridge) गर्डर टाकण्याच्या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. हे बदल ८ मे ते १० मे २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत लागू राहतील.

ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, RPS-PRS Joint Venture Pvt. Ltd. तर्फे हे काम केले जाणार आहे. कामाचा पहिला टप्पा ८ मे रोजी रात्री ११:५५ ते ९ मे रात्री ११:५५ पर्यंत असेल, तर दुसरा टप्पा ९ मे रात्री ११:५५ ते १० मे रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील. या काळात ब्रह्मांड सिग्नल ते कापूरबावडी दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल.

वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग: १. ब्रह्मांड ते कापूरबावडी: ब्रह्मांड सिग्नलकडून कापूरबावडीकडे जाणारी वाहने आता आझाद नगर रोड, ब्रह्मांड सर्कल आणि लोढा अमारा जंक्शन मार्गे कोलशेत-ढोकळी रोडने पुढे जाऊ शकतील. २. मानपाडा ब्रिज: मानपाडा ब्रिजचा रॅम्प (एमजी मोटर्स शोरूम जवळ) सर्व वाहनांसाठी बंद राहील. ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्यांनी मानपाडा ब्रिजच्या शेजारील स्लिप रोडचा वापर करून टिकुजिनीवाडी सर्कल मार्गे प्रवास करावा. ३. अत्यावश्यक सेवा: पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि ऑक्सिजन वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे.

या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी सहकार्य करावे आणि प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *