
पुणे/मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्रात भीषण उकाडा आणि उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान विभागाने सुखद बातमी दिली आहे. राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पाऊस सक्रिय झाला असून, पुढील ३ ते ४ दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात ताजी आकडेवारी जाहीर केली असून काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून पावसाची धडाकेबाज हजेरी पाहायला मिळेल. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दमदार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईकरांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार: राज्यात पावसाचे ढग दाटून आले असले तरी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मात्र पावसाची हुलकावणी कायम आहे. किनारपट्टी भागात पुढील ४-५ दिवस वातावरण अत्यंत दमट राहील आणि उकाडा कायम जाणवेल. मुंबईकरांना पावसात चिंब भिजण्यासाठी किमान अजून एक आठवडा वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. समुद्रावरील वाऱ्यांच्या स्थितीमुळे मुंबईत पावसाचे आगमन होण्यास विलंब होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.


