
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यात मुंबईने मिळवलेल्या रोमांचक विजयाची जेवढी चर्चा आहे, तेवढाच एक नवा वाद आता मैदानाबाहेर उफाळून आला आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने भारतीय संघातील त्याचा सहकारी खेळाडू तिलक वर्मा याच्या वर्णावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावरून क्रिकेट वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका वाद काय? गुरुवारी झालेल्या सामन्यात तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचा नायक ठरला. सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, जो स्वतः अर्शदीप सिंगने शूट केल्याचे समजते. या व्हिडिओमध्ये अर्शदीपने तिलक वर्माला हाक मारताना म्हटले, “ओ अंधेरे, इधर आ. सनस्क्रीन नहीं लगाई?” त्यावर तिलकने आपण सनस्क्रीन लावल्याचे सांगितले. त्यानंतर अर्शदीपने तिथेच बसलेल्या नमन धीरकडे पाहत पंजाबी भाषेत, “याला म्हणतात खरी चमक, जी नैसर्गिक आहे,” अशी टिप्पणी केली.
सोशल मीडियावर अर्शदीपवर तीव्र टीका: हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अर्शदीप सिंहवर वर्णद्वेषी (Racial/Colorist) टिप्पणी केल्याचा आरोप होत असून क्रीडाप्रेमींनी त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीही अर्शदीप काही वैयक्तिक कारणांमुळे वादात सापडला होता, मात्र आता सहकारी खेळाडूची अशा प्रकारे खिल्ली उडवल्याने त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्सच्या अडचणी वाढल्या: मागच्या वर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या पंजाब किंग्ससाठी हा सीजन अत्यंत संमिश्र ठरत आहे. दमदार सुरुवातीनंतर आता संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यातच मुख्य खेळाडू अशा वादात अडकल्यामुळे संघाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावर अद्याप बीसीसीआय (BCCI) किंवा आयपीएल कमिटीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

