
ठाणे (pragatbharat.com) : एसटी आणि पीएमपीएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा ठाणे क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने दोन महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३७.१९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या अटकेमुळे ठाण्यातील चोरीचे तब्बल ९ गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत.
वृद्ध महिलांना करायच्या टार्गेट: गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिला गर्दीच्या बसमध्ये चढून प्रामुख्याने वृद्ध प्रवाशांना लक्ष्य करायच्या. नुकतीच एक ७२ वर्षीय वृद्ध महिला खारेगाव नाका ते ओझोन व्हॅली दरम्यान बसने प्रवास करत असताना, त्यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने असलेले पाकीट चोरीला गेले होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासावरून अटक: पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती गोळा केली. अखेर ७ मे २०२६ रोजी सापळा रचून दोन्ही महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे संगीता दशरथ पिठकर (वय ४५) आणि सुरेखा बजरंग गायकवाड (वय ४७) अशी असून, त्या मुंबईतील मुलुंड परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पालघरमध्ये वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल दरम्यान, शेजारील पालघर जिल्ह्यातूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. कातकरी या आदिवासी समाजातील एका २३ वर्षीय मजुराला पैशांचे आमिष दाखवून वेठबिगार म्हणून काम करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुराला सरकारी योजनेतून घर मंजूर झाल्याने तो गावाकडे जात असताना मालकाने त्याला धमकावून डांबून ठेवले होते. श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांत ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘वेठबिगारी पद्धत (निर्मूलन) कायदा’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

