
नागपूर (pragatbharat.com) : उपराजधानी नागपुरातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन बेपत्ता मुलीच्या शोधासाठी आलेल्या असहाय्य कुटुंबाला मदत करण्याऐवजी, तेथील पोलीस निरीक्षकाने “वाहनात डिझेल नाही, आम्ही कुठे शोधणार? पैसे द्या मग शोधतो,” असे अत्यंत बेजबाबदार उत्तर दिले. या धक्कादायक संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कारवाईचे आदेश ही गंभीर घटना समोर आल्यानंतर नागपूरचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. जनमानसातून उमटणाऱ्या तीव्र संतापानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता या लाचखोर आणि असंवेदनशील अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजय वडेट्टीवार यांची सरकारवर सडकून टीका या प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, “सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातींमध्ये ‘सुरक्षित महाराष्ट्र’ दाखवला जातो, पण वास्तवात पोलिसांकडे बेपत्ता मुलगी शोधायला डिझेलसुद्धा नाही? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे स्वतःच्या हजारो कोटींच्या इव्हेंट्स, सेल्फी आणि पीआरसाठी पैसा आहे, पण नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाही.” वडेट्टीवार यांनी पुढे टोला लगावला की, “देशाला अमृतकाळाची स्वप्ने दाखवणाऱ्यांच्या राजवटीत पोलीस स्टेशनची गाडी डिझेलअभावी बंद पडते, हा अमृतकाळ नसून व्यवस्थेच्या अपयशाचा काळ आहे.”
राज्यात डिझेलचा तुटवडा आणि विरोधकांचा हल्लाबोल सध्या राज्याच्या काही भागांत डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. परंतु, एका अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना पोलिसांनी डिझेलचे आणि पैशांचे कारण पुढे केल्याने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत, अशी घणाघाती टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.

