
रोम/नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारताने कृषी उत्पादन वाढवून, अन्न सुरक्षा बळकट करून आणि कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून जगासमोर एक नवीन आदर्श मॉडेल सादर केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (FAO) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित ‘ॲग्रिकोला पदक’ (Agricola Medal) बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हा बहुमान नव्या भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचे प्रतीक असल्याचे चौहान यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळापासून सरकारने सुमारे ८० कोटी लोकांना जगातील सर्वात मोठे अन्न सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे. तसेच ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जात आहे. जागतिक स्तरावर भारताची धोरणे, नेतृत्व आणि मानवतावादी दृष्टिकोन आदराने पाहिला जात असून हे पदक देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींच्या या जागतिक सन्मानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या कृषी क्षेत्राची मान उंचावली असून, भारतीय शेतीचा शाश्वत विकास आणि अन्न स्वावलंबन याचे कौतुक जगभरात होत आहे.

