वना धरण ९५ टक्के भरले; आज सकाळी ९ वाजल्यापासून ८०० क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी (pragatbharat.com):- पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (24 जुलै) सकाळी 9 वाजल्यापासून पवना नदीपात्रात विद्युत गृहाद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण प्रकल्प प्रशासनाने दिली आहे.

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा लक्षात घेता नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून 5 हजार क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणार आहे.

सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पवना नदी खोऱ्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प पवनानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *