Maharashtra Epstein Files: भोंदू खरातवरील चित्रपटात दिपाली सय्यद यांची मुख्य भूमिका; धमक्या आल्याने जिद्दीने २ ऑक्टोबरला सिनेमा होणार रिलीज

मुंबई (pragatbharat.com) : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर आधारित आगामी ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या चित्रपटाबाबत एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद या वादग्रस्त चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केल्यापासून आपल्याला अनेक धमक्या आल्या असून, याच धमक्यांमुळे आपण आता अधिक जिद्दीने हा चित्रपट पूर्ण करणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी जाहीर केले आहे.

धमक्यांनंतर दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला: प्रसारमाध्यमांशी बोलताना दिपाली सय्यद यांनी सांगितले की, “अशोक खरातच्या कारनाम्यांवर आधारित या चित्रपटात काम करत असल्यामुळे मला फोनवरून धमक्या आल्या आहेत. मात्र, मी या धमक्यांना अजिबात डरणार नाही. मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिघांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या धमक्यांबाबत सविस्तर माहिती देणार आहे.” या धमक्यांमुळेच आपण अधिक जिद्दीला पेटलो असून, हा चित्रपट जनतेसमोर आणणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रदर्शनाची तारीख: हा चित्रपट स्वतः दिपाली सय्यद निर्माण करत नसून, त्या केवळ एक कलाकार म्हणून यात काम करत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना या भोंदूबाबाच्या प्रकरणाची भीषणता समजली. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप सावंत करत असून, जून महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा बहुचर्चित चित्रपट आगामी २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार आहे.

इम्रान हाश्मी साकारणार मुख्य भूमिका? ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ या सिनेमात भोंदू अशोक खरात म्हणजेच ‘कॅप्टन खरात’ची मुख्य आणि नकारात्मक भूमिका कोण साकारणार, याबद्दल संपूर्ण चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मी याच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती समोर आली आहे. खरातने महिलांचे केलेले लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून जमवलेली अमाप संपत्ती, या सर्व काळ्या कृत्यांचा पर्दाफाश या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *