
पुणे (pragatbharat.com) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. राहुरीचे नगराध्यक्ष आणि आपल्या शेकडो समर्थकांसह त्यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचे स्पष्ट केले.
प्राजक्त तनपुरे हे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे असल्याने त्यांच्या या पक्षबदलाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या या निर्णयामागची सविस्तर भूमिका मांडली.
“जयंत पाटील माझे मामा, पण राजकारण वेगळे” जयंत पाटील यांच्याशी असलेल्या नात्याबाबत आणि राजकीय समीकरणाबाबत विचारले असता प्राजक्त तनपुरे म्हणाले, “माझं गेल्या काही दिवसांत त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. आमचं शेवटचं राजकीय बोलणं राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळीच झालं होतं. आम्ही नातेवाईक असलो, ते माझे मामा आणि मी भाचा असलो, तरी आमच्या दोघांच्या मतदारसंघाची राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगवेगळी आहेत. त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, त्यामुळे माझ्या भाजप प्रवेशाचा त्यांच्या राजकारणाशी कोणताही संबंध नाही.”
पक्षप्रवेशाचे मुख्य कारण: मतदारसंघाचा विकास आणि निधी विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघाला मोठी किंमत मोजावी लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “सत्ता गेल्यानंतर राहुरीतील विकासकामांना ब्रेक लागला होता. मतदारसंघात निधी कमी पडू नये आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखला जावा, हेच माझ्या भाजप प्रवेशाचे मुख्य कारण आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता किंवा माझी कोणतीही चौकशी सुरू नव्हती,” असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळेंची भेट आणि शरद पवारांबाबत भाष्य: पक्षांतरापूर्वीच्या घडामोडींवर बोलताना त्यांनी सांगितले की, “मी कालच सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली होती आणि माझ्या मनातील भावना त्यांच्या कानावर घातल्या आहेत. त्यांच्या सदिच्छा नेहमीच माझ्यासोबत राहतील. तसेच, आदरणीय शरद पवार यांच्याशीही माझी फोनवर एक-दोनदा चर्चा झाली असून, मी त्यांचीही प्रत्यक्ष भेट आवर्जून घेणार आहे.” याशिवाय, पूर्वी झालेल्या एका बैठकीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती आणि तेव्हा अजित पवार हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते, असा मोठा खुलासाही त्यांनी यावेळी केला.


