लक्ष्मण हाके यांचा छगन भुजबळ आणि पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप; जरांगेंचे आंदोलन म्हणजे ‘स्क्रिप्टेड’ एकांकिका, प्रसाद लाडांवर घसरली जीभ

पुणे (pragatbharat.com) : मनोज जरांगे पाटील यांच्या एकदिवसीय आंदोलनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची मनधरणी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी यावरून ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारसह महायुतीच्या बड्या नेत्यांवर अत्यंत गंभीर आणि शेलक्या शब्दांत आरोप केले आहेत. “छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे हे जरांगे यांच्या झुंडीला घाबरले आहेत,” असा खळबळजनक आरोप हाके यांनी केला आहे.

“जरांगेचे आंदोलन म्हणजे ठरवून केलेली एकांकिका” माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी सरकार आणि आंदोलकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांचे आंदोलन पूर्णपणे ‘स्क्रिप्टेड’ (ठरवून केलेले) होते. मुख्यमंत्र्यांची खुर्ची आणि सरकार अस्थिर करण्यासाठी हे सर्व नाट्य घडवून आणले गेले. महाराष्ट्रातील मंत्री जरांगे यांना का भेटतात, हेच समजत नाही. सरकार त्यांच्यासमोर लाचार झाले असून त्यांच्या असंविधानिक मागण्या मान्य करून जरांगे यांचा अहंकार कुरवाळला जात आहे.”

प्रसाद लाड आणि विखे पाटलांवर घणाघाती टीका: आंदोलनाची मनधरणी करण्यासाठी गेलेल्या सरकारी शिष्टमंडळावर तोफ डागताना हाके यांची जीभ घसरली. त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उल्लेख अत्यंत वादग्रस्त शब्दांत केला. हाके म्हणाले, “केलेले पाप धुण्यासाठी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंकडे गेले होते. विखे यांनी आपल्या घराण्याची इभ्रत पायधुळीस मिळवली. प्रसाद लाड हे कमिशन एजंट असून त्यांच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतला गेला आहे.” तसेच, प्रसाद लाड यांच्याच मदतीने पक्ष स्थापन करून जरांगे यांना ‘विजय थलपती’ व्हायचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ओबीसी नेत्यांना आणि भाजपला इशारा: आपल्या हक्काच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करताना हाके म्हणाले, “जरांगेच्या भीतीपोटी भुजबळ आणि पंकजा मुंडे गप्प आहेत. मात्र, ओबीसी समाज या सर्व प्रकाराला मतदानातून चोख उत्तर देईल. गेल्या दोन वर्षांत भाजपचा मूळ डीएनए शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे ओबीसी समाज आता भाजपपासून दूर जात आहे.” जर मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले जात असेल, तर राज्यातील इतर ४०० जातींसाठीही वेगळे मंत्रालय स्थापन करा, अशी मागणी करत “महाराष्ट्राचा ७/१२ तुमच्या नावावर आहे का?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. हाके यांच्या या वादग्रस्त आणि आक्रमक विधानांमुळे राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *