Pune Hooch Tragedy: पुण्यात विषारी दारूचे तांडव; मृतांचा आकडा २४ वर, २१ अधिकारी निलंबित तर भिवंडीतून हजारो लिटर मिथेनॉल जप्त

पुणे (pragatbharat.com) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या भीषण विषारी दारू कांडात बळी गेलेल्यांचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडळ आणि ससाणे नगर परिसरात आणखी दोन जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले असून, विकास किसन केदारी (वय ६०) आणि निलेश घोलप (वय ४५) अशी या मृत नागरिकांची नावे आहेत. या नवीन मृत्यूंमुळे एकट्या पुणे शहरात बळींची संख्या ९ झाली आहे, तर फुगेवाडी आणि उरुळी कांचन येथेही शनिवारी मृत्यूंची नोंद झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला आहे.

२१ अधिकारी निलंबित; ‘सीआयडी’ (CID) कडे तपास: या अत्यंत गंभीर घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तडकाफडकी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपासाची जबाबदारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आली असून, सीआयडीने ५ विशेष पथके तयार केली आहेत.

भिवंडी कनेक्शन उघड; ५,९२९ लिटर मिथेनॉल जप्त: पुण्यातील या विषारी दारूचे धागेदोरे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत पोहोचले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भिवंडीतील एका गोदामावर शुक्रवारी रात्री मोठा छापा टाकून तब्बल ५,९२९ लिटर मिथेनॉलचा साठा जप्त केला. पुण्यात विषारी दारू तयार करण्यासाठी याच घातक मिथेनॉलचा वापर करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे.

राज्यभर धडक मोहीम; ४२ हजार लिटर रसायन नष्ट: या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अवैध अड्ड्यांवर छापे मारून ४,४८० लिटर गावठी दारू जप्त केली, तर दारू तयार करण्यासाठी साठवलेले ४२ हजार लिटर घातक रसायन नष्ट केले. या कारवाईत आतापर्यंत ५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुणे ग्रामीणमधील पौड पोलिसांनी मुळशी, रिहे, घोटावडे आणि माले परिसरात १० ते १२ हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.

नागपुरातही पडसाद; ५६ जणांवर गुन्हे दाखल: पुण्यातील या दुर्घटनेचे पडसाद थेट नागपूरपर्यंत उमटले आहेत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील ४३ ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी ५६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हिंगणा, कामठी आणि कोराडी भागात ही मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, “पुण्यासारखी भीषण दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *