Ranveer Singh vs FWICE Don 3 Controversy: ‘डॉन ३’ चा वाद न्यायालयात! इंडस्ट्रीतील बंदीविरोधात अभिनेता रणवीर सिंहचे मोठे पाऊल; FWICE ला पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबई (pragatbharat.com) : ‘डॉन ३’ (Don 3) या बहुप्रतीक्षित चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे अभिनेता रणवीर सिंह आणि चित्रपट निर्माते यांच्यात सुरू झालेला वाद आता थेट कोर्टात पोहोचला आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (FWICE) रणवीरविरोधात जारी केलेल्या ‘असहकाराच्या आदेशा’ (Non Co-operation Directive) विरोधात रणवीर सिंहने आक्रमक भूमिका घेतली आहे. रणवीरने थेट फेडरेशनला कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवत न्यायालयात धाव घेतली आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंहच्या कायदेविषयक टीमने २ जून रोजी फेडरेशनला ही नोटीस बजावली आहे. फेडरेशनने आपल्या सर्व सदस्यांना रणवीर सिंहसोबत यापुढे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम न करण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे रणवीरवर एकप्रकारे चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात आली होती. या नोटिशीनंतर आता FWICE ने आज, ३ जून रोजी तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे ‘डॉन ३’ चा मूळ वाद? रणवीर सिंहने २०२३ मध्ये दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली होती आणि त्याची अधिकृत घोषणाही झाली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ‘धुरंधर’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रणवीरचे मानधन आणि इतर मुद्द्यांवरून फरहानसोबत मतभेद झाले. परिणामी, शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी रणवीरने अचानक चित्रपटातून माघार घेतली. यामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यानंतर फरहान अख्तरने फेडरेशनकडे तक्रार केली. फेडरेशनने रणवीरला बाजू मांडण्यासाठी तीन वेळा नोटिसा पाठवल्या, पण त्यावर उत्तर न मिळाल्याने अखेर त्याच्यावर असहकाराचा आदेश जारी करण्यात आला.

टीपी अग्रवाल यांचेही रणवीरला समर्थन: या वादात ‘हम तुम्हारे हैं सनम’ चित्रपटाचे निर्माते आणि IMPPA चे माजी अध्यक्ष टीपी अग्रवाल यांनी यापूर्वीच रणवीर सिंहचे समर्थन केले आहे. फेडरेशनने रणवीरविरोधात घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली असून फेडरेशनवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. रणवीरच्या या कायदेशीर पावलामुळे आता ‘डॉन ३’ आणि बॉलिवूडमधील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *