विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या ४ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, महायुतीचे संख्याबळ भक्कम

भंडारा (pragatbharat.com) : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच, भंडारा-गोंदिया आणि नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अत्यंत मोठ्या राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत. भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावाची घोषणा होताच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गृहजिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. लाखांदूर नगरपंचायतमधील काँग्रेसच्या चार खंद्या नगरसेवकांनी पक्षाला ‘हात’ दाखवत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

नाना पटोले यांचे अत्यंत विश्वासू समर्थक मानले जाणारे लाखांदूर नगरपंचायते स्वीकृत सदस्य बंटी उर्फ मुकेश सहजवानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. तर लोभा शिलार, वैशाली कुडेगावे आणि निशा बघमारे या नगरसेविकांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसला अद्याप उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी अनेकांशी संपर्क साधला असून, अंतर्गत नाराजीमुळे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे बैठकीला गैरहजर राहिले, ज्यामुळे उमेदवार निश्चितीची जबाबदारी आता माजी मंत्री नितीन राऊत यांच्यावर पडली आहे.

या मतदारसंघातील संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे अत्यंत जड आणि एकतर्फी दिसत आहे. एकूण ८२६ मतदारांपैकी एकट्या महायुतीकडे ५५९ मतदार (भाजप ५२०, शिवसेना ३०, राष्ट्रवादी ९) आहेत, तर महाविकास आघाडीकडे केवळ २०० मतदार आहेत. असे असूनही, नाना पटोले यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. “भाजप फक्त ईव्हीएममुळेच जिंकतो, ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार असल्याने आम्हीच बाजी मारणार,” असा मोठा दावा पटोले यांनी केला आहे. पराभूत झालेल्या विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा अविनाश ब्राह्मणकर यांना मैदानात उतरवले असून, या निवडणुकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *