
टॉन्टन (pragatbharat.com) : आगामी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ ला अवघे ११ दिवस शिल्लक असताना भारतीय महिला क्रिकेट संघाला एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. टॉन्टन येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात यजमान इंग्लंड महिला संघाने भारतीय संघावर ६ विकेट्स राखून दणदणीत मात केली. या विजयासोबतच इंग्लंडने तीन सामन्यांची ही टी-२० मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर झालेल्या या पराभवामुळे भारतीय संघाची चिंता वाढली असून कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने खेळाडूंच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सामन्यानंतर बोलताना कॅप्टन हरमनप्रीत कौरचा पारा चांगलाच चढला होता. तिने उपकर्णधार स्मृती मंधाना किंवा फलंदाजांवर नव्हे, तर थेट गोलंदाजांवर पराभवाचे खापर फोडले. हरमनप्रीत म्हणाली, “आम्ही सामन्यात अत्यंत मजबूत स्थितीत होतो आणि इंग्लंडच्या ३ विकेट्स लवकर काढल्या होत्या. त्यानंतर आम्हाला केवळ एका महत्त्वाच्या विकेटची गरज होती. परंतु, आमच्या बॉलर्सना ती भागीदारी तोडता आली नाही आणि विरोधी संघातील दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत आमच्या हातातून सामना हिरावून घेतला.” मात्र, या पराभवातून संघ बरेच काही शिकला असून वर्ल्ड कपच्या मोहिमेत या चुका सुधारण्यास मदत होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
आगामी महायुद्धासाठी भारतीय संघाची रणनीती स्पष्ट असल्याचे सांगताना हरमनप्रीत म्हणाली की, संघाची ‘प्लेइंग इलेव्हन’ (Playing 11) जवळपास निश्चित झाली आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारताकडे अजून २ सराव सामने शिल्लक असून, त्यामध्ये इतर काही खेळाडूंना पडताळून पाहिले जाईल. भारतीय महिला संघ आपली टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची पहिली लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १४ जून रोजी खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताचे पारडे जड असले, तरी विजेतेपदासाठी हरमनप्रीतच्या संघाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांचे मोठे आव्हान पार करावे लागणार आहे.


