
मुंबई (pragatbharat.com) : मराठी सिनेसृष्टीचे ‘महानायक’ आणि अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ आज आपला ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून आणि जगभरातील मराठी चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि खास पोस्ट शेअर केली आहे. एका सुंदर पारंपरिक फोटोशूटचा फोटो शेअर करत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “अशोक, आज तू ७९ व्या वर्षात पदार्पण करतोयस यावर अजूनही विश्वास बसत नाही. वय हा केवळ एक आकडा आहे, हे तू तुझ्या ऊर्जेने सिद्ध केले आहेस. तुझी तुझ्या कामाप्रती असलेली निष्ठा, शिस्त आणि स्वतःवरील नियंत्रण यासाठी तुला शतश: प्रणाम. तू एक आदर्श मुलगा, प्रेमळ पिता, उत्तम पती आणि माझा जिवलग मित्र आहेस. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा डार्लिंग!” त्यांच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अशोक मामांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी १९८९ मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली होती. या लोकप्रिय जोडीच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. त्यांची पहिली भेट ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान दादरच्या ऐतिहासिक शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाली होती. विशेष म्हणजे, जेव्हा अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा निवेदिता अवघ्या ६ वर्षांच्या होत्या. नुकतीच ही लाडकी जोडी जगप्रसिद्ध ‘कान चित्रपट महोत्सव २०२६’ (Cannes Film Festival) च्या रेड कार्पेटवर एकत्र झळकली होती. तिथल्या त्यांच्या मराठमोळ्या आणि रॉयल अंदाजाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.


