
मुंबई (pragatbharat.com) : आषाढी वारीच्या महान परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटिबद्ध आहे. हा उपक्रम शासन, आध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एक प्रभावी लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. मंत्रालयात आयोजित ‘निर्मल वारी आणि हरित वारी’ उपक्रमाच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. पंढरपूर संस्थानचे विश्वस्त तथा संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी केलेल्या विनंतीची प्राधान्याने दखल घेत या बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर वारकऱ्यांना तीव्र उन्हापासून दिलासा देण्यासाठी आणि सावली मिळवून देण्यासाठी व्यापक हरित पट्टे विकसित करण्यात येत आहेत. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अभिजीत औटे, वन विभागाचे विवेक खांडेकर तसेच सेवा सहयोग फाउंडेशनचे अतुल नागरस व नरेंद्र वैशंपायन उपस्थित होते.
क्रिकेटच्या ‘डॉट बॉल’मधून पालखी मार्गावर होणार वृक्षारोपण: या बैठकीत एक नाविन्यपूर्ण संकल्पना समोर आली आहे. क्रिकेट सामन्यांदरम्यान जेवढे ‘डॉट बॉल’ पडतील, तेवढे वृक्ष लावण्याचा लोकहितकारी उपक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) हाती घेतला आहे. या उपक्रमातील वृक्ष लागवडीसाठी पालखी मार्गांना प्राधान्य देण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना शिवाजीराव मोरे यांनी केली. मंत्री ॲड. शेलार यांनी तात्काळ ‘MCA’ च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून यावर शिक्कामोर्तब केले. तसेच, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी राज्याने हाती घेतलेल्या मोठ्या वृक्षलागवड अभियानाचा एक भाग म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्याशी चर्चा करून पालखी मार्गांवर प्राधान्याने वृक्षारोपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मंत्री शेलार म्हणाले की, पायाभूत सुविधा उभारताना जे वृक्ष कापले जातात, त्यांच्या बदल्यात विकासकांना अन्यत्र वृक्षलागवड करणे अनिवार्य असते. हे वृक्षारोपण आता प्राधान्याने पालखी मार्गांवर केले जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या कल्याणकारी उपक्रमासाठी तातडीने ना हरकत प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावे, असे आदेश त्यांनी दिले. पालखी मार्गांवर सावली देणाऱ्या देशी वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच त्यांची नियमित देखभाल, टँकरने पाणीपुरवठा आणि ट्री-गार्डच्या संरक्षणाची व्यवस्था करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.



