
मुंबई (pragatbharat.com) : राज्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामांसाठी विद्यापीठाचे उंबरठे झिजवण्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने (BATU) सुरू केलेल्या ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ (Student Facilitation System) या एकात्मिक डिजिटल व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना आता सर्व शैक्षणिक सेवा एकाच क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. या सुविधेमुळे परीक्षा अर्जापासून ते निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया अत्यंत सुलभ, वेगवान आणि पारदर्शक झाली असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले. मंत्रालयात आयोजित विद्यापीठाच्या परीक्षा, निकाल आणि उपकेंद्रांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या उच्चस्तरीय बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. अमित शेष, परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामूणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठाने एकाच शैक्षणिक वर्षात ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत प्रसिद्ध करून ‘शून्य निकाल प्रलंबितता’ (Zero Pendency) हे ऐतिहासिक उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. वेळेत निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी मिळवणे सोपे होणार आहे.
अंतिम वर्षाचा निकाल ८४ ते ९२ टक्क्यांवर: विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ ९६२ निकाल तांत्रिक कारणांमुळे (महाविद्यालयांकडून अंतर्गत गुण न मिळणे किंवा परीक्षा अर्ज न भरणे) तात्पुरते प्रलंबित आहेत, तेही लवकरच जाहीर केले जातील. विशेष म्हणजे, अभियांत्रिकी (Engineering) आणि फार्मसी (Pharmacy) या दोन्ही विद्याशाखांमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सातव्या आणि आठव्या सत्रातील उत्तीर्णतेची टक्केवारी ८४ ते ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ अंतर्गत आता गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) आणि तक्रार निवारण या सर्व सेवा एकाच व्यासपीठावर आणल्या गेल्या आहेत. निकाल प्रक्रियेतील या उल्लेखनीय यशाबद्दल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करून अभिनंदन केले, तसेच आगामी काळात विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवोपक्रम या त्रिसूत्रीवर विशेष भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.



