पहिल्या चेंडूवर सिक्स मारणारा वैभव सूर्यवंशी स्ट्राइकपासून दूर का? भारत ‘अ’ संघाच्या पराभवानंतर रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह

कोलंबो (pragatbharat.com) : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत भारतीय ‘अ’ (India A) संघाला श्रीलंका ‘अ’ (Sri Lanka A) संघाविरुद्ध अत्यंत अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना केवळ अटीतटीचाच झाला नाही, तर कमी सूर्यप्रकाश, वादग्रस्त अंपायरिंग आणि वैभव सूर्यवंशीची श्रीलंकन खेळाडूंसोबत झालेली बाचाबाची व धक्काबुक्की यामुळे प्रचंड वादग्रस्त ठरला. मात्र, या पराभवानंतर भारतीय संघाच्या रणनीतीवर आणि विशेषतः युवा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूपासून स्ट्राइक न देण्याच्या निर्णयावर आता क्रीडा जगतातून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सामना टाय आणि सुपर ओव्हरचा थरार: भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० ओव्हर्समध्ये २६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही ९ बाद २६५ धावा केल्यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत तब्बल १६ धावा कुटल्या आणि भारतासमोर विजयासाठी १७ धावांचे कठीण आव्हान ठेवले. आयपीएलमध्ये (IPL) पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची क्षमता असलेला भारताचा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी मैदानात उतरल्याने भारताचा विजय सुकर वाटत होता. मात्र, भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे या जोडीला सुपर ओव्हरमध्ये फक्त ९ धावाच करता आल्या.

सूर्यांश शेडगेला स्ट्राइक देण्याचा निर्णय भारी पडला? या ‘करो या मरो’च्या सामन्यात १७ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने पहिल्या चेंडूवर स्ट्राइक घेणे अपेक्षित होते. मात्र, सर्वांना आश्चर्यचकित करत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यांश शेडगेने पहिली स्ट्राइक घेतली. श्रीलंकेचा गोलंदाज कुगाथस मथुलनच्या पहिल्या तीन चेंडूवर शेडगेला केवळ ३ धावाच काढता आल्या. त्यामुळे सुरुवातीचे तीन चेंडू वैभव सूर्यवंशीला स्ट्राइकच मिळाली नाही, ज्यामुळे भारतावरील दडपण कमालीचे वाढले.

वैभव उशिरा स्ट्राइकवर आला अन् सामना हातातून गेला: वैभव सूर्यवंशी चौथ्या चेंडूवर जेव्हा स्ट्राइकवर आला, तेव्हा भारताला ३ चेंडूत १४ धावांची गरज होती. वैभवने चौथ्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि पाचव्या चेंडूवर शानदार चौकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ८ धावांची अशक्य गरज असताना मथुलनने अचूक यॉर्कर टाकला आणि वैभवला धाव घेता आली नाही. जर वैभव पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकवर असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असा सूर आता उमटत आहे. या सलग दुसऱ्या पराभवामुळे भारतीय ‘अ’ संघाचा अंतिम फेरीचा (Final) मार्ग आता अत्यंत किचकट बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *