
मुंबई/धाराशिव (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत गाजलेल्या आणि दीर्घकाळ चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड खटल्याचा बहुप्रतिक्षित निकाल आज, १६ जून २०२६ रोजी विशेष न्यायालयात लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणि काही कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायाधीशांनी हा निकाल पुढे ढकलला आहे. या खटल्यातील मुख्य शूटर पिंटू चौधरी (पिंटू सिंह) याला प्रत्यक्ष कोर्टात हजर न केल्यामुळे विशेष न्यायालयाने हा निर्णय घेतला असून, आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी आगामी २० जून २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
कोर्टात आज नक्की काय घडले? या खटल्यातील एकूण ९ आरोपींपैकी मुख्य आरोपी माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपी आज न्यायालयात हजर होते. मात्र, मुख्य शूटर पिंटू चौधरी सध्या बिहारमध्ये दुसऱ्या एका गुन्ह्याखाली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्याला आज केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा संवेदनशील खटल्याचा निकाल देताना आरोपीची प्रत्यक्ष उपस्थिती (Physical Presence) अनिवार्य आहे. पिंटू चौधरीची १९ जून रोजी बिहारमधील कोर्टात तारीख असल्याने, बिहार पोलीस त्याला २० जून रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करणार आहेत. या खटल्यात आतापर्यंत एकूण १२८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
माझा राजकीय जन्मच त्या न्यायासाठी – ओमराजे निंबाळकर: निकाल पुढे ढकलल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर कमालीचे भावूक झाले. ते म्हणाले, “गेली २० वर्षे १३ दिवसांपासून आमचे दोन्ही परिवार या निकालाची आणि न्यायाची प्रतीक्षा करत आहेत. आम्ही संविधानाच्या मार्गाने ही लढाई लढलो. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी देशात प्रचंड संघर्ष करावा लागतो, वकिलांची फी देणे सामान्यांना परवडत नाही. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आणि तपास सीबीआयकडे (CBI) गेला. सीबीआयमुळेच सर्व आरोपी समोर आले.”
शांत डोक्याने केलेली राजकीय हत्या: आपल्या वडिलांच्या हत्येमागील राजकीय कारणाचा उलगडा करताना ओमराजे म्हणाले, “२००४ च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या वडिलांनी अपक्ष लढूनही तत्कालीन बलाढ्य नेते पद्मसिंह पाटील यांचा केवळ ४८४ मतांनी विजय झाला होता. तोही खोटा प्रचार करून मिळवला होता. तोच पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. आपल्याला जिल्ह्यात कोणताही राजकीय विरोधक शिल्लक नको, या भावनेतून शांत डोक्याने, पूर्ण प्लॅनिंग करून ही हत्या घडवून आणली गेली. पण विरोधक खून करून संपत नसतो, तो तिथूनच जन्म घेतो. धाराशिवच्या जनतेने मला हाताच्या फोडासारखे जपत आज इथपर्यंत पोहोचवले आहे. २० जून रोजी कोर्टाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.”


