
चंद्रपूर/नागपूर (pragatbharat.com) : महाराष्ट्रात आधीच राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असताना, आता चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस अंतर्गत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांमधील म्हणजेच खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वाद आता थेट विकोपाला गेला आहे. बहुमताची संधी असूनही अंतर्गत गटबाजीमुळे महापौरपद गमावल्यानंतर, आता महापालिकेत काँग्रेस अंतर्गत थेट स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
महापौर निवडणुकीत एका मताने बसला होता फटका: जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसने २७, भाजपने २३, उद्धव सेनेने ६, शेकापने ३, वंचितने २, अपक्ष २ आणि अन्यांनी जागा जिंकल्या होत्या. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र असल्याने काँग्रेसचा महापौर बसणे निश्चित होते. मात्र, निकालाच्या पहिल्या दिवसापासूनच नगरसेवकांची विभागणी धानोरकर गट विरुद्ध वडेट्टीवार गट अशी झाली. याचा थेट फायदा भाजपला मिळाला आणि भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौरपद पटकावले.
गटनेत्याविरुद्ध १६ नगरसेवक एकवटले; विभागीय आयुक्तांची घेणार भेट: सत्ता हातातून गेल्यानंतरही या दोन्ही गटांतील वाद शांत झालेला नाही. वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्या विरोधात धानोरकर गटाचे १६ नगरसेवक एकत्र आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरकर समर्थकांनी वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केला आहे. या संदर्भातील अधिकृत मंजुरी आणि गटनेता बदलासाठी मंगळवारी हा गट नागपूर येथील विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) कार्यालयात पोहोचणार आहे. काँग्रेसच्या २७ पैकी १६ नगरसेवकांनी बंड पुकारल्याने बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचाली आता अंतिम टप्प्यात आहेत.
पूर्वी सत्ता स्थापनेच्या वेळी प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून हा वाद तात्पुरता मिटवला होता, मात्र आता हा संघर्ष पुन्हा उफाळून आल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. ही अंतर्गत गटबाजी चंद्रपूर जिल्ह्यासह आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी हानिकारक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


