
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटातील काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP-SP) अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
संजय राऊत यांचा ‘१५ कोटींचा’ खळबळजनक दावा या राजकीय भूकंपाची ठिणगी शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पडली. राऊत यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्रातील खासदारांना फोडण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स दिला जात आहे. ‘अपना सपना मनी मनी’ म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. या दाव्यानंतर विरोधी छावणीत मोठी अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी, ज्या लोकप्रतिनिधींचा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे नेहमी उघडे असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
आमदार रोहित पवार महायुती सरकारवर भडकले ठाकरे गटातील या संभाव्य फुटीच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत महायुती सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला आहे. रोहित पवार यांनी राज्यातील गंभीर प्रश्नांकडे बोट दाखवत म्हटले की, “एकीकडे मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, तरुणांना रोजगार मिळत नाही, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि आरोग्य व्यवस्थेचे बारा वाजले आहेत. एल-निनोच्या प्रभावामुळे आणि कमी पावसामुळे शेतकरी चिंतेत असताना, सत्ताधारी मात्र आमदार-खासदार खरेदी-विक्रीचा बाजार गरम करत आहेत.”
पुढे तीव्र संताप व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की, “फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना दोघांना लाज वाटली पाहिजे.” जनतेचा विश्वास तोडणाऱ्या अशा प्रवृत्तींना जनतेनेच लोकशाहीच्या मार्गाने राजकीय धडा शिकवावा, अशी वेळ आता आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मातोश्रीवरील बैठकीचे वास्तव या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व ९ लोकसभा खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रत्यक्षात फक्त ४ खासदार वैयक्तिकरी्या उपस्थित होते, तर उर्वरित ५ खासदारांनी कौटुंबिक आणि स्थानिक निवडणुकांच्या कारणास्तव ऑनलाइन (व्हर्च्युअली) हजेरी लावली होती. ठाकरे गटाने सर्व खासदार एकनिष्ठ असल्याचा दावा केला असला, तरी दिल्ली आणि मुंबईतील राजकीय हालचालींमुळे संशयाचे ढग गडद झाले आहेत.


