ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? थेट ५ खासदार फुटणार; अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा

मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीमुळे राजकीय भूकंप झालेला असतानाच, आता दुसरा मोठा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP Sharad Pawar) बसणार असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या फुटीनंतर सर्वच राजकीय पक्ष अलर्ट मोडवर आले असताना, आता अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटातील खासदारांबद्दल एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

१२ डिसेंबरपूर्वी शरद पवार गटाचे ५ खासदार फुटणार? : अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट तारीख जाहीर करत दावा केला आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तब्बल ५ खासदार आगामी १२ डिसेंबरपर्यंत आमच्या पक्षात (अजित पवार गटात) येऊ शकतात.” आत्राम यांनी केवळ खासदारच नव्हे, तर शरद पवार गटातील अनेक आमदारही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली येण्यास उत्सुक असल्याचा दावा केला आहे. जर त्यांना भविष्यात पुन्हा निवडून यायचे असेल आणि आपल्या मतदारसंघात कामे करायची असतील, तर सत्ताधारी पक्षात येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन’ करण्याची गरज नाही, ते स्वतःच येतील : या संभाव्य राजकीय फुटीबद्दल अधिक बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “आम्हाला कोणतेही विशेष ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही, ते स्वतःच (तुतारीवाले) आमच्याकडे येतील.” दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे या राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी आधीच आपला स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले असून, आजच त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची दाट शक्यता आहे. आता शिवसेनंतर शरद पवारांचाही पक्ष फोडण्याची तयारी सुरू आहे का? यावर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *