
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले असून ठाकरे गटाचे तब्बल ६ खासदार फुटले आहेत. गुरुवारी दिल्लीत पार पडलेल्या ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या (Parliamentary Party) महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून हे ६ खासदार अनुपस्थित राहिले. हे सर्व खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे आता निश्चित मानले जात आहे. या मोठ्या राजकीय भूकंपावर हिंगोलीचे शिवसेनेचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून “आगे आगे देखो होता है क्या!”, म्हणत ठाकरे गटाचे आणखी १३ ते १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे बॅनर : ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभेतून निवडून आलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील या बंडखोर खासदारांमध्ये सामील आहेत. आष्टीकर यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा होण्यापूर्वीच आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरामध्ये त्यांचे स्वागत करणारे मोठे बॅनर लावले आहेत. “नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन,” असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. बांगर म्हणाले की, “मी सहा महिन्यांपूर्वीच हे भाकीत केले होते. आष्टीकर यांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला विकास आता जलद गतीने होईल.”
कोणते खासदार फुटले आणि कोण ठाकरेंसोबत? : मिळालेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत बंडखोरी केलेल्या ६ खासदारांमध्ये संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई) यांचा समावेश आहे. या मोठ्या फुटीनंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत संसदेत केवळ अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई) आणि राजाभाऊ वाजे (नाशिक) हे ३ खासदार उरले आहेत. बाळासाहेबांच्या मूळ विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे आणि महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार बांगर यांनी यावेळी व्यक्त केला. या राजकीय भूकंपाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


