मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला! आमदार प्रसाद लाड आक्रमक, संपकऱ्यांवर ‘मेस्मा’ लावण्याची मागणी; उबाठा, काँग्रेस अन् कम्युनिस्ट पक्षावर गंभीर आरोप

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईची लोकवाहिनी समजली जाणाऱ्या ‘बेस्ट’ (BEST) बस कर्मचाऱ्यांच्या संपाने हिंसक वळण घेतले असून, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आणि ‘श्रमिक उत्कर्ष समिती’चे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्त्यांवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “हा संप पूर्णपणे अनधिकृत असून, मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या आणि बसेसवर दगडफेक करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने ‘मेस्मा’ (MESMA) अंतर्गत कारवाई करावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या अनधिकृत संपामागे उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेचा (Admissions) काळ सुरू असताना अशा पद्धतीमध्ये मुंबईकरांना धारेवर धरणं अत्यंत चुकीचे आहे, असे लाड म्हणाले. त्यांनी सांगितले की, बेस्ट मधील ९०% मूळ कर्मचारी संपामध्ये सहभागी नसून, कंत्राटी बस चालकांकडून हा संप केला जात आहे. गुरुवारी सकाळी वडाळा, कुर्ला, मुलुंड आणि धारावी डेपो परिसरात काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आली. या गुंडगिरीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सांगत त्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून कंत्राटी बसेस बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.

कंत्राट रद्द करून मूळ बेस्ट कर्मचाऱ्यांना घ्या; प्रमुख मागण्या काय? : आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, मुंबईकरांना सातत्याने ब्लॅकमेल करणाऱ्या खाजगी कंत्राटदारांचे (Contractors) कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे आणि त्या जागी थेट बेस्टच्या अधिकृत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. दुसरीकडे, बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्यात समन्वय सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

  • बेस्ट बस सेवांचे सरसकट कंत्राटीकरण तातडीने थांबवावे.
  • बेस्टच्या मालमत्तांचा पीपीपी (PPP) तत्त्वावर होणाऱ्या पुनर्विकासाला विरोध.
  • बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य अर्थसंकल्पात विलीन करावा.
  • निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकाच वेळी (एकरकमी) देण्यात यावीत.
  • कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *