
मुंबई (pragatbharat.com) : परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत तसेच सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. मुंबईतील एमएसआरडीसी कार्यालय (निर्मल भवन) येथे आयोजित विशेष आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
रोबोटिक सर्जरी आणि अत्याधुनिक कॅथलॅब परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत परभणी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ‘रोबोटिक सर्जरी सेवा’ उपलब्ध करून देण्यासाठी परिपूर्ण कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सेलू येथे अत्याधुनिक ‘कॅथलॅब’ स्थापन करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
आरोग्य संस्थांचा विस्तार आणि दर्जोन्नती जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खालील प्रस्तावांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:
- रुग्णालय विस्तार: जिंतूर येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय आणि सेलू येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारणे.
- ट्रॉमा केअर व विशेष केंद्रे: सोनपेठ व बोरी येथे ट्रॉमा केअर सेंटर, गंगाखेड येथे महिला रुग्णालय आणि जिल्ह्यात ५० खाटांच्या नशामुक्ती केंद्राची उभारणी करणे.
- कक्षांची दर्जोन्नती: विविध आरोग्य संस्थांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि मॉड्युलर लेबर रूम यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे.
परभणीतील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि उपसंचालकांनी प्रत्यक्ष जिल्हा भेट देऊन आढावा घ्यावा, असेही मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, रुग्णालये सह संचालक डॉ. सुनीता गोल्हाईत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


