मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवाशाची चाकू भोसकून हत्या; ‘डोअर’च्या वादातून आरोपीला पनवेलमधून अटक

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात मंगळवारी रात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली. मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका २९ वर्षीय तरुणाने सहप्रवाशाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत ४०० हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून आरोपीला पनवेल रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. रोशन सुवर्णा (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, मयंक लोहार असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

पावसामुळे सुरू झाला होता वाद पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन सुवर्णा अंधेरी येथील एका कार्गो सुविधेत काम करतो आणि ॲमेझॉनच्या साहित्यांचे वितरण करण्याचे अर्धवेळ कामही करतो. मंगळवारी रात्री त्याने अंधेरी स्थानकातून लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवेश केला आणि तो दरवाजाजवळ उभा राहिला. मुसळधार पाऊस सुरू असल्याने डब्यात पाणी येत होते, ज्यामुळे मृत मयंक लोहार याने रोशनला दरवाजा बंद करण्यास सांगितले.

यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका वाढला की दरवाजाजवळ बसलेले इतर ४ ते ६ प्रवासीही यात सामील झाले. या सर्वांनी मिळून रोशनला मारहाण केली, ज्यामध्ये त्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

डोळ्यातून रक्त आल्याने सूडाची भावना लोकल ट्रेन मालाड आणि कांदिवली स्थानकांच्या दरम्यान असताना, आपल्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे रोशनच्या लक्षात आले. या मारहाणीला आणि अपमानाला मयंक लोहार हाच जबाबदार आहे, या रागातून रोशनने आपल्या बॅगमधून धारदार चाकू काढला आणि मयंकवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. हत्येसाठी वापरलेला चाकू रोशनला त्याच्या एका मित्राने विक्रीसाठी नमुना (Sample) म्हणून दिला होता.

४०० सीसीटीव्ही आणि ७ पथकांचा थरारक शोध ट्रेन बोरीवली स्थानकात पोहोचत असताना, गाडीचा वेग कमी होताच आरोपी रोशनने धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि पळ काढला. बोरीवलीतून रिक्षा पकडून तो मीरा-भाईंदर येथील आपल्या घरी पोहोचला, तिथे त्याने कपडे बदलले आणि तात्काळ घर सोडले.

या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कोपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी बोरीवली ते मीरा-भाईंदर परिसरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. आरोपीच्या घराचा शोध घेऊन त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे लोकेशन पनवेल स्थानक ट्रॅक केले. रोशन पनवेल येथील नातेवाईकांकडे गेला होता आणि तिथून तो ट्रेन पकडून आपल्या मूळ गावी मंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पनवेल स्थानकातून बेड्या ठोकल्या. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, पोलीस आता हत्यार जप्त करण्याचे काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *