
जळगाव (pragatbharat.com) : महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे पार मोडले आहे. देशात इंधन दरवाढीचा (Petrol Diesel Price Hike) सलग चौथा धक्का बसल्यानंतर, आता सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींनी (Gold Silver Price Today) उच्चांक गाठला आहे. गेल्या दहा दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दुहेरी दरवाढीमुळे ऐन लग्नसराई आणि अधिकमासाच्या (Adhik Maas 2026) खरेदीच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
पेट्रोल-डिझेल कडाडले; सोन्यालाही झळाळी: आज देशात पेट्रोलच्या दरात २.६१ रुपयांनी, तर डिझेलच्या दरात २.१७ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या इंधन दरवाढीच्या पाठोपाठ जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. काल सोन्याचे दर १,६५,५०० रुपये (१० ग्रॅम) या पातळीवर होते, मात्र आता ही वाढ होऊन दर थेट १,५७,००० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे, चांदीचे दर प्रति किलो २७,००० रुपयांवर स्थिर असले तरी, मागील वर्षाच्या तुलनेत ही दरवाढ ऐतिहासिक मानली जात आहे.
अधिकमासाच्या खरेदीवर चांदीचा ‘ताण’: हिंदू संस्कृतीमध्ये अधिकमासाच्या (धोंड्याचा महिना) निमित्ताने सासरच्या बाजूने जावयाला आणि लेकीला चांदीच्या वस्तू किंवा वाण भेट देण्याची जुनी प्रथा आहे. मात्र, यंदा चांदीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल एक लाख रुपयांहून अधिक वाढल्याचे चित्र आहे.
- बजेट कोलमडले: चांदीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे लेकी-जावयाला मानाचे वाण देणे सासऱ्यांसाठी मोठे आर्थिक संकट ठरत आहे.
- कमी वजनाच्या वस्तूंना पसंती: सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असली, तरी बजेट सांभाळण्यासाठी ग्राहक आता कमी वजनाच्या आणि कमी किमतीच्या चांदीच्या वस्तू खरेदी करत असल्याच्या प्रतिक्रिया सुवर्ण व्यावसायिकांनी दिल्या आहेत.
किमती वाढण्यामागचे मुख्य कारण काय? सुवर्ण तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील भू-राजकीय तणाव (Geopolitical Tension) आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. तसेच, भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यामुळे परदेशातून सोने मागवणे महाग झाले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण देखील या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.


