
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल 2026 (IPL 2026) मधील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अत्यंत निराशाजनक प्रवास अखेर संपला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही मुंबईला ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेली एक मोठी चूक संघाला कशी महागात पडली, याचे कारण स्पष्ट केले आहे.
शेवटच्या ५ षटकांनी फिरवला सामना: सामना संपल्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “राजस्थानने उभारलेले २०६ धावांचे लक्ष्य गाठणे अशक्य नव्हते. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती आणि चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. परंतु, आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत तब्बल ७३ धावा दिल्या, ज्यामुळे सामन्यात मोठा फरक पडला. आम्ही गोलंदाजीत किमान १० ते १५ धावा जास्त दिल्या.”
पॉवरप्लेमधील विकेट्स आणि फलंदाजांच्या चुका: हार्दिकने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतील त्रुटींवरही बोट ठेवले. “२०६ धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्येच आमच्या महत्त्वाच्या विकेट्स पडल्या. जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण मधल्या फळीतील चुका मुंबई इंडियन्सला नडल्या,” असे हार्दिकने मान्य केले.
मुंबई इंडियन्सची ६ वर्षांपासून प्रतीक्षा कायम: मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत खराब ठरला. संघाने १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामन्यांत विजय मिळवला, तर तब्बल १० सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. २०१० नंतर मुंबईने एकही आयपीएल विजेतेपद पटकावलेले नाही, त्यामुळे त्यांच्या सहाव्या ट्रॉफीची प्रतीक्षा आता ६ वर्षांवर पोहोचली आहे.
IPL 2026 प्लेऑफचे चित्र स्पष्ट: मुंबईचा पराभव झाला असला तरी राजस्थान रॉयल्सने या विजयासह प्लेऑफमधील चौथे स्थान पक्के केले आहे. प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- २६ मे (क्वालिफायर १): रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) (धरणशाळा)
- २७ मे (एलिमिनेटर): सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) (चंदिगढ)
- २९ मे (क्वालिफायर २): क्वालिफायर १ मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजेता
- ३१ मे (अंतिम सामना): अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला रंगणार आहे.


