
पुणे (pragatbharat.com) : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल संध्याकाळी म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइन (U Min Aung Hlaing) यांची नवी दिल्लीत भेट घेतली. म्यानमारच्या राष्ट्रपतींचा चालू कार्यकाळातील हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. दोन्ही देशांमधील प्रदीर्घ द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने म्यानमारच्या राष्ट्रपतींनी दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेचे डॉ. जयशंकर यांनी कौतुक केले आहे.
दोन्ही देशांमधील शांतता, प्रगती आणि समृद्धीची भागीदारी पुढे नेण्यासाठी राष्ट्रपती ह्लाइन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होणाऱ्या आगामी बैठकीविषयी डॉ. जयशंकर यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींसोबत होणार द्विपक्षीय चर्चा: म्यानमारचे राष्ट्रपती उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करतील. याशिवाय, ते एका विशेष बिझनेस फोरममध्ये देखील सहभागी होणार आहेत. दिल्लीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर, मंगळवारी ते मुंबई दौऱ्यावर जाणार असून, तिथे उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधतील आणि काही प्रमुख स्थळांना भेटी देतील.
गया येथील महाबोधी मंदिरात घेतले दर्शन: राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइन हे काल संध्याकाळी ५ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले. विमानतळावर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. दिल्लीत येण्यापूर्वी म्यानमारच्या राष्ट्रपतींनी बिहारमधील गया येथे भेट देऊन जागतिक प्रसिद्ध महाबोधी मंदिरात प्रार्थना केली. त्यांच्यासोबत म्यानमारचे अनेक कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात आले आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि व्यापारी संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


