
ओस्लो (नॉर्वे) (pragatbharat.com) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज सुरू झाला असून, ते नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आयोजित ‘तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत’ (3rd India-Nordic Summit) सहभागी झाले आहेत. या परिषदेचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, संरक्षण, शाश्वत विकास आणि द्विपक्षीय व्यापार या क्षेत्रांमध्ये भारताची नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणे हा आहे.
५ देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्र; धोरणात्मक भागीदारीवर भर
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन, फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो, आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टुन फ्रॉस्टाडोटिर आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन एकत्र आले आहेत. २०१८ मध्ये स्टॉकहोम आणि २०२२ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या परिषदांनंतर होत असलेली ही तिसरी बैठक आहे. ही परिषद भारत आणि नॉर्डिक देशांमधील हरित संक्रमण (Green Transition), ब्लू इकॉनॉमी, अंतराळ संशोधन आणि आर्क्टिक सहकार्याला एक नवी दिशा देईल.
आइसलँडच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक
या मुख्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टुन फॉस्टाडोटिर (Kristrún Frostadóttir) यांच्यासोबत अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार संबंध दृढ करण्यावर आणि ‘इंडिया-इएफटीए’ (India-EFTA) व्यापार कराराचा विस्तार करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान
या दौऱ्यादरम्यान कालच पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ (Grand Cross of the Royal Norwegian Order of Merit) प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि भारत-नॉर्वे मैत्री दृढ करण्यासाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना हा ३२ वा जागतिक बहुमान मिळाला आहे. या परिषदेमुळे भारत-युरोप मुक्त व्यापार कराराला (FTA) मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

