
जर्मनी/पुणे (pragatbharat.com) : जर्मनीतील सुहल (Suhl) येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद २०२६’ (ISSF Junior World Championship) स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी आपली दबदबा कायम राखला आहे. पुण्याच्या अवघ्या १६ वर्षीय प्रितम केंद्रे (Pritam Kendre) याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. नुकतीच दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेल्या प्रितमचे हे केवळ दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून, त्याने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा मानाने फडकवला आहे.
अटीतटीच्या फायनलमध्ये मारला बाजी:
प्रितमने ८ नेमबाजांच्या अंतिम फेरीत २५१.३ गुणांची अचूक नोंद करत अव्वल स्थान पटकावले. त्याने न्यूट्रल (तटस्थ) खेळाडू टिमोफेई अलेनिकोव्ह (रजत पदक) आणि नॉर्वेच्या जेन्स ओस्टली (कांस्य पदक) यांना मागे टाकत हे सुवर्ण यश संपादन केले. प्रितमने अंतिम फेरीत कमालीच्या दडपणाखाली १५ शॉट्स हे १०.५ किंवा त्याहून अधिक गुणांचे मारले, ज्यात दोन वेळा १०.९ गुणांचा समावेश होता. प्रितमसोबत भारताचा पीयूष शर्मा देखील अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र अवघ्या ०.१ गुणाच्या फरकाने त्याचे पदक हुकले आणि त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रितमने आपल्या या यशाचे श्रेय दिग्गज नेमबाज गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी’ (Gun For Glory) अकॅडमीला दिले आहे.
महिला संघाला कांस्य पदक; भारताची पदकांची संख्या ११ वर:
याच स्पर्धेत भारताने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक (Team) प्रकारात कांस्यपदक (Bronze) मिळवले आहे. अंजली भागवत, पारिशा गुप्ता आणि निथिला क्रिस्टोफर या त्रिकुटाने १७१३ गुणांसह पोडियमवर स्थान मिळवले.
या पदकांसह भारताने ५ सुवर्णपदकांसह आपल्या पदकांची एकूण संख्या ११ वर पोहोचवली असून गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. दुर्दैवाने, पुरुषांच्या संघ प्रकारात भारताचे तिसरे सदस्य अभिनव शॉ यांचे उपकरण ‘आयएसएसएफ’च्या नियमात अपात्र ठरल्यामुळे भारताला त्यामध्ये भाग घेता आला नाही. या ५ व्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत ७० देशांतील ८०० हून अधिक नेमबाज सहभागी झाले असून, भारताने ८४ खेळाडूंचे पथक पाठवले आहे. ही स्पर्धा २६ जून २०२६ पर्यंत चालणार आहे.


