
जळगाव (pragatbharat.com) : आगामी जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी (Jalgaon Vidhan Parishad Election 2026) भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून, पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते नंदकिशोर महाजन यांना मैदानात उतरवले आहे. तब्बल २० वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या तांदलवाडी येथील निवासस्थानाबाहेर फटाक्यांची आतिशबाजी करत प्रचंड जल्लोष केला.
उमेदवारी मिळाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांची पहिली प्रतिक्रिया: पक्षाकडून नाव जाहीर होताच नंदकिशोर महाजन यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. जळगावमध्ये महायुतीने यापूर्वी दणदणीत विजय मिळवले आहेत, त्यामुळे सर्व नगरसेवकांच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिले की सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी मिळते, हे यावरून स्पष्ट होते.”
कोण आहेत नंदकिशोर महाजन? (Nandkishor Mahajan Profile): रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असलेले नंदकिशोर महाजन हे पदवीधर असून व्यवसायाने शेतकरी आहेत. जिल्ह्यात ते राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे आणि अत्यंत निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळखले जातात. २००७ ते २०१७ या काळात त्यांनी दोन वेळा रावेर पंचायत समितीचे सदस्यपद आणि २००९ ते २०१२ दरम्यान सभापतीपद भूषवले आहे. याशिवाय जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०१७ ते २०२१ दरम्यान ते जिल्हा परिषद सदस्य होते, तर २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पक्षाने त्यांच्याकडे २०१९ आणि २०२४ च्या रावेर लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाची महत्त्वाची धुरा सोपवली होती.
महायुतीचे जागावाटप आणि निवडणूक कार्यक्रम: विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून, महायुतीमध्ये भाजप ११ जागा लढवणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ४ आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, आज १ जून २०२६ ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. २ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर ४ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.


