
परभणी (pragatbharat.com) : आगामी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Parbhani-Hingoli Vidhan Parishad Election 2026) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला आहे. सर्व जुने तर्कवितर्क आणि अंदाज बाजूला सारत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचा अल्पसंख्याक समाजातील तरुण आणि आक्रमक चेहरा सईद खान यांना आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. सईद खान हे सध्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून, ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कोअर टीमचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात.
अल्पसंख्याक समाजाला महायुतीची साद, बदलणार राजकीय समीकरणे: सईद खान यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडाली असून, येथील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या पारंपरिक हिंदू मतदारांसोबतच अल्पसंख्याक समाजाला महायुतीकडे (Mahayuti) आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी खेळलेला हा पत्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महाविकास आघाडीच्या (MVA) बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी ही राजकीय खेळी गेमचेंजर ठरू शकते.
कोण आहेत सईद खान? (Who is Saeed Khan): सईद खान हे गेल्या १५ वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ९ जुलै २०२३ रोजी त्यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षबांधणीसाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे ९०० अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
निवडणुकीतील कामगिरी आणि ‘पाथरी पॅटर्न’: सईद खान यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रासपकडून निवडणूक लढवून तब्बल ५५,००० मते घेतली होती. मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून अल्पसंख्याक समाजासाठी तब्बल ५,६०० कोटी रुपयांचा निधी (प्रामुख्याने शिष्यवृत्ती व विकास महामंडळ) मंजूर करून आणला.
केवळ पाथरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी ९५० कोटी रुपयांची विकासकामे केली. २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आणली, जिथे नगराध्यक्ष आणि ९ नगरसेवक निवडून आले. नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी पाथरीतून २ जिल्हा परिषद सदस्य आणि ४ पंचायत समिती सदस्य निवडून आणले, तसेच पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) ९ संचालक निवडून आणून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या याच संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना आता थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.


