
नवी दिल्ली (pragatbharat.com) : रेल्वे विभागात नोकरी मिळवून देशाची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या महाराष्ट्रातील आणि देशभरातील लाखो तरुण-तरुणींसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाने (RRB) जून २०२६ च्या सुरुवातीलाच एक मोठी घोषणा करत विविध विभागांमधील ९,००० हून अधिक रिक्त पदांसाठी अधिकृत नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा: या मेगा भरती मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने तंत्रज्ञ (Technician), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक पदांचा समावेश आहे. वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून, मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण, १२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण, आयटीआय (ITI) किंवा संबंधित ट्रेडमधील इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी धारक उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतील. उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे ते कमाल ३3 वर्षे असणे आवश्यक आहे, तसेच शासकीय नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा? या भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणकावर आधारित परीक्षा (CBT – Computer Based Test), कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांना रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत प्रादेशिक संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२६ आहे. उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीपत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करूनच आपले अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


