KKR vs MI IPL 2026: इडन गार्डन्सवर आज केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स थरार! कोलकाता गेल्या पराभवाचा वचपा काढणार की पलटण बाजी मारणार?

कोलकाता (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या १९ व्या हंगामात आज, २० मे रोजी एक अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर घरचा संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. चालू हंगामात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत असून, केकेआरकडे आपल्या घरच्या मैदानावर मुंबईकडून मिळालेल्या गेल्या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे.

केकेआरसाठी प्लेऑफचे अस्तित्व पणाला: मुंबई इंडियन्सचा संघ आधीच या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा मुंबईच्या स्थितीवर विशेष फरक पडणार नाही. मात्र, कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. केकेआरचे प्लेऑफमधील आव्हान जरी केवळ स्वतःच्या कामगिरीवर अवलंबून नसले, तरी गणिते जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आजचा १३ वा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरची कोलकाता पलटण हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

पहिल्या सामन्यातील पराभवाचा हिशोब पूर्ण करणार का? विशेष म्हणजे, केकेआर आणि मुंबई या दोन्ही संघांनी १९ व्या मोसमाची सुरुवात २९ मार्च रोजी एकमेकांविरुद्धच केली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात केकेआरने दिलेले २२१ धावांचे अजस्त्र आव्हान मुंबईने १९.१ ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून पूर्ण केले होते. मुंबईने २०१२ नंतर पहिल्यांदाच हंगामातील आपला उद्घाटनाचा सामना जिंकला होता. आता कोलकात्याच्या होम ग्राउंडवर केकेआर या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी उत्सुक आहे.

पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांची सद्यस्थिती: आयपीएल २०२६ च्या ताज्या पॉइंट्स टेबलनुसार, दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत तळाला चाचपडत आहेत. केकेआर सध्या आठव्या क्रमांकावर आहे. त्यांनी १२ पैकी ५ सामने जिंकले असून ५ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाब किंग्स विरुद्धचा त्यांचा १ सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात ११ गुण आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स ८ गुणांसह नवव्या स्थानी आहे. मुंबईने १२ पैकी केवळ ४ सामने जिंकले असून तब्बल ८ सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. आजच्या इडन गार्डन्सवरील सामन्यात कोण मैदान मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *