
मुंबई (pragatbharat.com) : रोजचा तब्बल तीन तासांचा खडतर रेल्वे प्रवास टाळून आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा आणि कामाच्या ठिकाणी जवळ घर घेता यावे, या एका प्रामाणिक इच्छेपोटी स्वतःचे घर विकणाऱ्या एका ५१ वर्षीय तंत्रज्ञाची (Technician) २९.५ लाख रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर पूर्व येथील बॉम्बे डाईंग मिल कॉलनीमध्ये ‘म्हाडा’चा (MHADA) फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका रिअल इस्टेट एजंटने या कुटुंबाला गंडा घातला आहे. स्वतःचे हक्काचे घर विकून बसलेल्या या कुटुंबावर आता थेट भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असून, मुंबईच्या भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी एजंटविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रवास सुकर करण्याच्या नादात बसला मोठा फटका मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय प्रमोद पाटील हे नवी मुंबईतील रबाळे येथील एका खाजगी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा नालासोपारा ते रबाळे हा रोजचा प्रवास अत्यंत थकवणारा होता. म्हणूनच त्यांनी २०२४ मध्ये आपला नालासोपाऱ्याचा फ्लॅट विकला आणि दादर परिसरात घर शोधू लागले. एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्यांची भेट काळाचौकी येथील म्हाडा कॉलनीत राहणारा रिअल इस्टेट एजंट अनिल अरुण माने (वय ३५) याच्याशी झाली. माने याने दादर पूर्व येथील बॉम्बे डाईंग मिल कॉलनीमध्ये म्हाडाचा फ्लॅट ४२.५ लाख रुपयांत देण्याचा व्यवहार ठरवला. पाटील यांनी सुरुवातीला २५,००ै रुपये टोकन आणि नंतर टप्प्याटप्प्याने १९.७५ लाख रुपये माने याला ट्रान्सफर केले. पाटील यांच्या पत्नी रेश्मा यांच्या नावाने एक नोटराईज्ड करारनामा (Notarised Agreement) देखील करण्यात आला. ३ महिन्यांत ताबा न दिल्यास व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन एजंटने दिले होते.
पैसे हडपले, एजंटचा गुन्हेगारी इतिहास उघड ३ महिने उलटूनही फ्लॅट न मिळाल्याने पाटील यांनी तगादा लावला असता, माने याने तो फ्लॅट उपलब्ध नसल्याचे सांगून ऑगस्ट २०२५ मध्ये दुसरा फ्लॅट दाखवला आणि आणखी ९.५ लाख रुपये उकळले. अशा प्रकारे पाटील यांनी एकूण २९.५ लाख रुपये दिले. मात्र, ना फ्लॅट मिळाला ना पैसे परत मिळाले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या एजंटचा मोठा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. अनिल माने याच्यावर यापूर्वीही आर.ए.के. मार्ग (RAK Marg) पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा म्हाडा फ्लॅट फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तो न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. इतकेच नव्हे तर, यापूर्वी त्याने एका पोलीस अधिकाऱ्याचीही अशाच पद्धतीने फसवणूक केली होती, मात्र तो वाद खाजगीत मिटवण्यात आला होता. “या फसवणुकीमुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली असून मी, माझी पत्नी आणि दोन मुलींसह पुन्हा नालासोपाऱ्यात भाड्याच्या घरात राहत आहोत,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडित प्रमोद पाटील यांनी दिली आहे. भोईवाडा पोलिसांनी आरोपी एजंट अनिल माने याला तपासात सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


