
विटा/सांगली (pragatbharat.com) : नागपूर-गोवा ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या भूसंपादनावरून सांगली जिल्ह्यातील विटा आणि खानापूर परिसरात शेतकरी आणि प्रशासनामधील संघर्ष अत्यंत टोकाला पोहोचला आहे. विटाजवळील भाग्यनगर आणि नागेवाडी परिसरात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थेट मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी पोलीस बळाचा वापर करून ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. या दडपशाहीच्या निषेधार्थ माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा ‘धडक आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. तहसील कार्यालयात ठिय्या मांडत राजू शेट्टी यांनी प्रांताधिकाऱ्यांना थेट सवाल केला की, “दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करून शेतकरी झोपलेला असताना, कोणतीही अधिसूचना न काढता रात्री २ आणि ३ वाजता चोरांसारखे ड्रोन सर्वेक्षण का करताय?”
शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट; मोजणी हाणून पाडली मिळालेल्या माहितीनुसार, सलग दोन दिवस विटा परिसरातील नागेवाडी आणि भाग्यनगर या गावांमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने ड्रोन उडवून मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या सुपीक जमिनी महामार्गात देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पहाटेच गावकऱ्यांना जाग आल्यानंतर शेतकरी महिला आणि पुरुषांनी थेट शेतात उतरून ड्रोन मोजणी रोखली. या दरम्यान अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र झटापट आणि वाद झाले. शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि आक्रोश पाहून अखेर प्रशासनाला मोजणी तात्काळ थांबवावी लागली.
“पोलीस प्रमुख हप्ते खाण्यात व्यस्त” – राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल या हुकूमशाही कारवाईविरोधात राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या नाकाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांची (Drugs) राजरोस विक्री सुरू आहे. सांगली आणि मिरज शहर अंमली पदार्थांचे हब बनले असून लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तिथल्या तस्करांकडून हप्ते घेणाऱ्या खाकी वर्दीतील लोकांना त्यांच्यावर कारवाई करायची हिंमत नाही; मात्र जनरल डायरच्या या औलादी रात्रीच्या वेळी गरीब शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत.” त्यांनी पुढे इशारा देताना म्हटले की, “सांगली हा क्रांतीसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी आणि जी. डी. लाड यांच्या संघर्षाची भूमी असलेला क्रांतिकारी जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने ही ताकद लक्षात ठेवावी, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झाल्यास तो शेतकरी रक्त सांडून हाणून पाडतील.”
या आंदोलनानंतर प्रांताधिकारी विक्रमसिंह बादल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्गाचा विरोध कायम असल्याने सांगलीत तणाव कायम आहे.



