
नागपूर (pragatbharat.com) : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट’ (NEET UG) परीक्षेतील सावळागोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. प्रश्नपत्रिका फुटीच्या गंभीर प्रकरणांनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कारभारावर देशभरातून टीका होत असतानाच, आता नागपूरमधील एका विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर (Admit Card) थेट परदेशातील परीक्षा केंद्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २१ जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेसाठी नागपूरच्या अब्दुल्ला मोहम्मद या विद्यार्थ्याला थेट संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) ‘अबुधाबी’ येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. उद्या परीक्षा असताना आणि हातात पासपोर्टही नसताना थेट अबुधाबीला परीक्षा द्यायला कसे जायचे, या विवंचनेने विद्यार्थी आणि पालकांची चांगलीच भांबेरी उडाली आहे.
नागपूरचा पर्याय दिला अन् केंद्र मिळाले थेट युएईमध्ये! : अब्दुल्ला मोहम्मद याने परीक्षा फॉर्म भरताना नागपूर, वर्धा आणि भंडारा या स्थानिक शहरांचे पर्याय दिले होते. मात्र, एनटीएच्या निष्काळजीपणामुळे त्याला देशाबाहेरील केंद्र मिळाले. एन ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या चुकीनंतर विद्यार्थ्याने तातडीने एनटीएच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी अखेर आपली चूक मान्य केली असून विद्यार्थ्याला नागपूरमधीलच केंद्र देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याला प्रचंड मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
देशभरात २२ लाख विद्यार्थी देणार परीक्षा; २ लाख कर्मचारी तैनात : रविवार, २१ जून रोजी देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये २२.७९ लाख विद्यार्थी नीटची ही पुनर्परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी देशभरात साडेपाच हजारांहून अधिक परीक्षा केंद्रांवर २ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अमरावतीत ४,६४८ विद्यार्थी सज्ज; जिल्हा प्रशासन अलर्टवर : दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यातून तब्बल ४ हजार ६४८ विद्यार्थी ही नीट परीक्षा देणार आहेत. रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार असून, अमरावती जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झाले आहे. गोपनीय परीक्षा साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष एस्कॉर्ट टीम तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी देशभरात ६,६६९ पर्यवेक्षक (Supervisors) आणि ६७४ शहर समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.


